आयुष्यात आपला आदर्श कोण व का?

IMG_4441

जीवनातील आपले आदर्श नक्की कोणते… 

आपण अनेकदा अनुभवलं असेल कि बरेच लोक आपल्याला सांगतात, आम्ही अमुक अमुक व्यक्तिला आमचा आदर्श मानतो. अगदी आदर्शच नसले तरी आपल्यावर कुण्यातरी व्यक्तिचा विशेष प्रभाव आहे असं बरेच लोकं सांगतात.
अनेकांसाठी  त्यांचे आई ,वडील, शिक्षक,भावंडांपैकी कुणी,तर कधी इतिहासातील किंवा वर्तमानातील कुणी थोर व्यक्ति असं कुणीही आदर्श होऊ शकतात. गमतीचा भाग म्हणजे अनेक लोकांचे आदर्श त्यांच्या वयानुसार बदलत असतात आणि काही मंडळी तर रोज नवे आदर्श देखील ठेऊ शकतात. असो.

 

आपण आदर्शांचा विचार करतो त्यांच्याकडून काही प्रेरणा घेण्यासाठी, ध्येयपूर्तीसाठी दिशादर्शक म्हणून किंवा अपयश आल्यावर नाउमेद न होता आदर्शांकडून प्रेरणा घेऊन परिश्रम करण्यासाठी.
आपल्या आयुष्याच्या ध्येयाची आणि त्यासाठी लागणाऱ्या नियोजनाची स्पष्टता आपल्याला असेल तर आदर्श डोळ्यासमोर ठेवताना आपली चूक होणार नाही हे निश्चित.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण ध्येय निश्चिती आणि त्यासाठीचे नियोजन याविषयीची माहिती वाचू शकतो.

 

मला आठवतं माझ्या बालपणी रामायण,महाभारत यांसारख्या काही ऐतिहासिक मालिकांमुळे आम्ही कधी श्रीराम, श्रीकृष्ण तर कधी छत्रपती शिवाजी, लोकमान्य टिळक, टिपू सुलतान यांना आपला आदर्श समजायचो. मालिका बदलली कि आदर्श बदलायचे.
पुढे १०वी -१२वी पर्यंत येता येता आम्ही सिनेकलाकारांना आपला आदर्श समजू लागलो होतो. सिनेकलाकारांची नक्कल करणे, तसेच कपडे घालणे, दाढी-केस  त्यांच्याप्रमाणे ठेवणे हे सगळे उद्योग आमच्यापैकीं अनेकांनी केलेले आहेत.
परंतु  मला वाटतं आपल्या देशात मुलांना आणि त्यांच्यापैकी अनेकांच्या पालकांना सगळ्यात जास्त वेड जर कुणी लावल असेल तर सचिन तेंडुलकर नावाच्या अवलियाने. १९९० आणि २०००च्या दशकातील दोन पिढ्या या माणसाने पागल केल्या अस म्हंटलं तरी अतिशयोक्ति होणार नाही. अवघा देश आपली सगळी कामं बाजूला ठेऊन या माणसाला खेळताना बघायला तयार असायचा आणि तो चांगला खेळावा म्हणून अनेक लोक प्रार्थना देखील करायचे हे आपल्याला ठाऊक आहे.

आपल्या आदर्शांसारखे होण्याचा खटाटोप…

आपल्याला असे अनेक लोक माहित असतील जे स्वतःच्या आदर्शांप्रमाणे यशस्वी होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतील आणि काही असेही असतील जे बोलताना अमुक आदर्श व्यक्तीबद्दल बोलतील आणि वागतील काही वेगळंच.
आपल्यापैकी अनेकांनी वर आलेल्या नावांपैकी किंवा अजून कुणाला तरी आयुष्यात आपला आदर्श नक्कीच समजल असेल. आता खरा खरा विचार करा, ह्या आदर्शांजवळ असलेले गुण आपल्यात यावे यासाठी किती लोकांनी प्रामाणिक प्रयत्न केलेले असतील? त्यांच्यासारख जगण्याचा किती लोकांनी प्रयत्न केला असेल?

खरंच इतक सोपी आहे का छत्रपती शिवाजी, ए.पी.जे. अब्दुल कलाम, तेंडुलकर, लता मंगेशकर होणं? आयुष्याचा प्रत्येक क्षण आणि देहाचा प्रत्येक कण झिजवल्यावर हि नावं इतकी मोठी झाली आहेत.

बाकी सगळे सोडा, सचिन तेंडुलकर होणं तरी सोपी आहे का? तेंडुलकरचे यशस्वी जीवन बघताना त्यानी केलेल्या प्रचंड मेहनतीचा, आयुष्यातील अनेक त्यागांचा, त्याच्या वैयत्तिक आयुष्यातील तसेच क्रिकेटच्या कारकिर्दीतील चढ उतारांचा विचार देखील कुणी करत असेल का? फक्त बोलायचं म्हणून तेंडुलकर आमचा आदर्श आहे असे अनेक लोक सांगतील पण ध्येयप्राप्तीसाठी त्याच्यासारखं जगण्याचा प्रयत्न करणारे फार थोडे असतील.
आदर्श डोळ्यासमोर ठेवताना चूक झाली कि आपली गडबड झालीच म्हणून समजा. उदा. कुणाला जर पैलवान व्हायचं असेल तर त्याने हनुमानाला आदर्श ठेवलं तर समजू शकतो पण जर याच व्यक्तीने एखाद्या चित्रकाराचा किंवा गायकाचा आदर्श ठेवला तर कसं चालेल?
 

पालकांच्या होणाऱ्या काही चुका… 

एक व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांवरील व्याख्यान ऐकून उत्साहात दहा लोकांत सांगितलं, माझ्या मुलाला मी शिवाजी सारखं लढायला शिकवणार. योजना चांगली आहे, फक्त अडचण अशी आहे कि शिवाजी लढला कसा हे अनेकांना ठाऊक आहे पण शिवाजी घडला कसा याचा विचार करायला कुणाकडेच वेळ नाही.
याच व्याख्यानात दुसऱ्या एका व्यक्तीने वक्त्याला प्रश्न विचारला, मला तर मुलगी आहे मग मी तिला शिवाजीचा आदर्श कसा सांगू?

 

शिवाजी व्यक्ती नसून वृत्ती आहे, संस्कार आहे हे आपण कधी लक्षातच घेतलं नाही आणि संस्कार हा मुलगा कि मुलगी हे पाहून आपण करणार काय?
ज्या महानायकाने हृदयात राम ठेऊन अवघं महाभारत घडवलं त्याला आपण एका विशिष्ट चष्म्यातूनच बघितलं. जे शिवचरित्र अनुकरणीय आहे ते कपाटात किंवा देव्हाऱ्यात ठेवण्याचा हा परिणाम कि आज अनेक पालक शिवाजी महाराजांबद्दल योग्य ती माहिती देखील मुलांना देऊ शकत नाही.

 

अनेकदा आपण बघतो, बरेच पालक आपल्या मुलांमधे विराट कोहली, सायना नेहवाल, कल्पना चावला, अमिताभ बच्चन यांसारख्या अनेकांना शोधत असतात. त्यासाठी मुलांवर अनाठायी दडपण देखील दिलं जात आणि मुलं देखील त्या दडपणाखाली पालकांनी ठेवलेल्या आदर्शाप्रमाणे होण्याच्या धावपळीत लागतात. त्यातील काही यशस्वी होतात तर काही नेहमीसाठी स्वतःच अस्तित्व  शोधत आयुष्यभर भटकत राहतात.
हि सगळी मंडळी त्या त्या वेळची सगळ्यात यशस्वी व्यक्तिमत्व आहेत ज्यांचं नाव इतिहासात अजरामर झालेल आहे. ह्या व्यक्तिमत्त्वांचा आदर्श पालकांनी मुलांना सकारात्मक पद्धतीने घालून दिला तर मुलांना नक्कीच फायदा होईल. पालकांनी याबाबत हवी ती काळजी घेऊन आपल्या मुलांना ह्या अनेक आदर्श जीवन चरित्रातील माहिती आणि बारकावे व्यवस्थित सांगितले तर मुलांना दडपण न येता त्यांना प्रेरणाच मिळेल असं मला वाटतं.

आयुष्यात आदर्श असावेत कि नसावेत…

 
आयुष्यात ध्येयप्राप्ती साठी आदर्श ठेवायची. नक्की ठेवायची, पण त्यांचं जीवन चरित्र वाचून -समजून आपलं आयुष्य चांगलं घडवायला.
नेहमी लक्षात असावं कि हि मंडळी आपल्या आयुष्यात आपले सद्गुण वाढवायला आहेत,आपल्या आयुष्यात वेळोवेळी मार्गदर्शन करायला आहेत.
आपल्या आदर्शांचा विचार करताना आपण खालील काही बाबींचा विचार केला तर त्याचा फायदा होईल अस मला वाटतं-
 • आपली अभिरुची ओळखून आपल्या आयुष्याचं ध्येय सगळ्यात आधी निश्चित करा.   
 • त्या ध्येयपूर्तीसाठी आपण अमुक व्यक्तीला आदर्श का मानतो ह्याचा विचार आधी करा. गरज असल्यास पालकांची किंवा शिक्षकांची,वरिष्ठांची मदत घ्या.   
 • त्या आदर्श व्यक्तीचे चरित्र वाचून अथवा समजून त्यातील गुण आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करा. 
 • ह्या आदर्शाचा  विचार करताना त्या प्रेरणेने आपलं वेगळ व्यक्तिमत्व घडवण्यासाठी सतत प्रयत्नशील रहा. 
 • अपयश हे कुणालाच चुकलेलं नाही. अगदी आपण ठेवलेल्या आदर्शाला सुद्धा नाही हे लक्षात असू द्या. अपयश आलं तरी खचून जाऊ नका. 
 • आपण ठेवलेल ध्येय गाठायला लागणारे काही गुण म्हणजे दुर्दम्य इच्छाशक्ती,प्रचंड मेहनत आणि प्रामाणिकपणा. आपल्या आदर्शाचे चरित्र वाचताना ह्या गुणांचा नक्की ध्यास घ्या.  
आपल्या आयुष्यातील दीपस्तंभासारखे आदर्श, आयुष्यातील ध्येयांबद्दलची स्पष्टता,आपल्यातला प्रामाणिकपणा आणि आपली मेहनत आपलं जीवन  समृद्ध करते, हे मात्र नक्की.

II अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त II 

ध्येयप्राप्तीसाठी नियोजनाचे महत्व

कॉर्पोरेट सेक्टर च्या प्रोजेक्ट मिटींग चा ज्यांना अनुभव आहे त्यांना एक वाक्य कदाचित ओळखीचं असेल “What’s your Action Plan?” 
कुठल्याही निश्चित उद्दिष्टप्राप्तीसाठी एक कृतिशील नियोजन गरजेचं असतं म्हणूनच हा प्रश्न महत्वाचा असतो. 

काही लोकं या प्रश्नावर त्यांची सखोल मतं मांडतात, काही लोकं शांत बसतात, तर काही म्हणतात या उगीचच्या कागदी प्लॅन्सची आम्हाला काहीच गरज नाही.

परिणाम काय तर जी मंडळी “What’s your Action Plan?” या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात ते इतर मंडळींचं नेतृत्व करतात आणि इतर मंडळींच्या कामाचा उपयोग स्वतःच्या प्रगतीसाठी करून स्वतःच एक वेगळं स्थान निर्माण करतात.

Continue reading “ध्येयप्राप्तीसाठी नियोजनाचे महत्व”

“ध्येयनिश्चिती”-आयुष्यात यशाची पहिली पायरी

प्रचंड मेहनत करूनही असमाधान का यावं?

आपण सगळे रोज दिवसरात्र भरपूर मेहनत करत असतो, अगदी सकाळी दिवस निघाल्यापासून ते रात्री झोपी जात पर्यंत निरनिराळी काम आपण अथक करत असतो. हि निरनिराळी काम करताना साहजिकच आपण घरच्यांपासून, मित्रांपासून,जवळच्या लोकांपासून नकळत दूर जात असतो.

बरं दिवसभर केलेल्या कामांचं समाधान रात्री झोपताना नेहमी असतंच अस नाही, उलट दुसऱ्या दिवशीच्या कामांच्या नियोजनात आपण घरात अनेकदा गंभीर वातावरण निर्माण करत असतो.

आता जरा एकांतात स्वतःला विचारा हे सगळं कशासाठी करतोय आपण? काय मिळवायचा आहे आपल्याला? आयुष्यात आपलं ध्येयं काय?

जर मनापासून खरा विचार केला तर अनेकांना अस जाणवेल कुठल्याही निश्चित ध्येयाशिवाय आपण इतकी वर्ष झटत आलो. आपल्या सभोवताली बघितलं तर अनेक लोकं दिसतात जी फक्त आलेला दिवस पुढे ढकलत दिवसभर झटत असतात. अनेकांना असे प्रश्न पडतात कि आपण इतकी मेहनत करतो तरी आपल्या आयुष्यात आनंद किंवा समाधान का नाही?

कदाचित हि सगळी मेहनत आणि प्रयत्न करण्यामागचा नेमका उद्देश आणि ध्येयनिश्चिती नसल्यामुळे प्रयत्नांती असमाधान येत असावं अस मला वाटतं.

आयुष्यात निश्चित ध्येय असण्याचे फायदे… 

आमच्या कंपनीच्या एका जागेसाठी काही उमेदवारांची मुलाखत घेण्याचा योग आला, काही नेहमीचे प्रश्न आणि त्यांची मजेशीर उत्तरं ऐकायला मिळाली. तुमचं आयुष्यातील ध्येयं काय? या प्रश्नावर काही मजेशीर उत्तरं आली

 मला महागडी कार घायची आहे, जगभ्रमंती करायची आहे, निरनिराळे व्यंजनं करून खायचे आहेत असे अनेक उत्तरं या प्रश्नासाठी आले. एक उत्तरं जे विशिष्ट लक्षात राहण्यासारखा आहे ते म्हणजे  मला पुढल्या १५ वर्षात नॅशनल मॅनेजर होऊन टिम लीड करायची आहे. आमच्या टीम ने त्या उमेदवाराला त्याच्या या उत्तरासाठी कंपनीत निवडलं.

अस काय विशेष होत त्या उत्तरात? कारण इतर उमेदवार देखील समतोल गुणवत्तेचे होते, मग त्या उमेदवारात अस काय होतं? त्या एका उत्तरामुळे मुलाखत घेणारे हुरळून जाण्याइतपत आमचे लोक नवखेही नव्हते.

लक्षात अस आलं कि त्या उमेदवाराच्या मनात  त्याचा  निश्चित उद्देश,ते मिळवण्यासाठी करण्याचे प्रयत्न आणि ध्येयप्राप्तीसाठी लागणारे गुण ह्या संकल्पना अगदी स्पष्ट होत्या.

इथे इंग्रजीतलं एक वाक्य लक्षात घेण्यासारख आहे,

” You don’t hire for skills,you hire for attitude.You can always teach skills.”  

त्या उमेदवाराला त्याच्या कौशल्यापेक्षा त्याच्या सकारात्मक वृत्ती साठी कंपनीनी निवडलं होतं, आणि हि वृत्ती तयार झाली होती त्याच्या निश्चित ध्येय संकल्पनेतून.

आपल्याला आयुष्यात काय मिळवायच आहे,नक्की आपलं ध्येय काय? हेच जर आपल्याला माहित नाही तर मग आपण त्यासाठी नियोजन आणि प्रयत्न कसे करणार? आणि नियोजनशून्य मेहनत ध्येयप्राप्ती न करता उलट आयुष्यात असमाधान निर्माण करते.

आपण इतिहासातील किंवा सध्याची कुठलीही यशस्वी व्यक्तिमत्व बघा, अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते अब्दुल कलामांपर्यंत. एका विशिष्ट ध्येयाने झपाटलेली हि  सगळी मंडळी आहेत हे तुम्हाला जाणवेल. ह्या सगळ्या मंडळींनी त्यांच्या आयुष्यात अपरिमित कष्ट भोगत, अविश्रांत परिश्रम आणि सकारात्मक वृत्ती यांच्या जोरावर यश संपादन केलं आहे.

मनात ध्येयनिश्चिती असली कि होणारे कष्ट हे जीवन समृद्ध करणाऱ्या शिक्षणाचा भाग वाटतात आणि सकारात्मक वृत्ती निर्माण होऊन सगळे परिश्रम आनंदाने घडत असतात.

ध्येयनिश्चिती संबंधी करावयाचा विचार

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी खालील काही बाबींचा विचार केला तर फायद्याचं होईल अस मला वाटतं-

 • आपल्याला आयुष्यात कुठलं ध्येय मिळवायचं आहे ते सगळ्यात आधी निश्चित करा. 
 • ध्येय निवडताना आपल्या स्वभावाचा, आवडीचा विचार देखील करावा.  
 • हे ध्येय मिळवण्याचा अवधीसुद्धा निर्धारित असावा.  
 • ठरवलेलं ध्येय हे फार सोपी नसावं किंवा साध्य करायला फार कठीणही नसावं. आपण केलेल्या प्रयत्नात आपली दिवसागणिक प्रगती होईल अस ध्येय ठेवावं. 
 • दीर्घकालीन ध्येय मिळवण्यासाठी अनेक अल्पकालीन उद्दिष्ट ठेऊन त्याच नियोजन करता येईल.  
 • आपले गुण निरंतर ध्येयप्राप्तीसाठी वाढवत राहण्यासाठी उपलब्ध सगळ्या संसाधनांचा वापर करू शकतो. ( उदा. विविध पुस्तकं, इंटरनेट, त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तीच मार्गदर्शन). 
 • आपल्या परिवारातील लोकं आपली फार मोठी शक्ती असतात. त्यांचं  मार्गदर्शन आणि साथ ध्येयनिश्चिती आणि प्राप्ती साठी नेहमी विचारात घ्या. 

आपण आयुष्यात ठेवलेली ध्येय गाठताना आपल्याला एक लक्षात येईल ध्येयप्राप्ती हे अंतिम गंतव्य नसून तो एक प्रवास आहे जो आपलं जीवन समृद्ध करत असतो. शेवटी काय ह्या सगळ्या प्रयत्नांमुळे ध्येयप्राप्ती सोबत आपल्या आयुष्याला आणि विचारांना धार लागते हे निश्चित.

  II अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त II