आई..भगवंतांची वात्सल्यमूर्ती!

cow 1

आई.. आज लेख लिहिताना शीर्षक काय ठेवावं हा प्रश्न पडला नाही मला. माझ्या आयुष्यातील अश्या अनेक चिंता फक्त या एका शब्दसमोर सहजगत्या संपल्या. शाळेत तिचं बोट धरून पहिल्यांदा जाण्यापासून ते स्वतःच करिअर सुरु करण्यापर्यंत असो कि, माझ्या बालपणातील खोड्या आणि तिने केलेले संस्कार ते आज माझ्या मुलीच्या खोड्या आणि  तिच्यावर होणारे संस्कार हे सारे सारे आईमुळेच घडले आणि पुढेही घडणार आहे. 

आज मातृदिनाचे अनेक विविधरंगी मेसेजेस आणि व्हिडिओज वॉट्सअँप वर आलेत. आपल्यापैकी अनेकांनी मातृदिनाच्या निमित्ताने आपल्या आईला शुभेच्छा आणि वंदन केलं असेल. तसं बघितलं तर, मातृदिनाची  संकल्पना हि पाश्चात्य देशांनी आणली आहे, तरी इतर डे साजरे करण्याला होणारा विरोध मात्र या दिवशी होताना दिसत नाही, याचं एकमेव कारण म्हणजे हा दिवस आईसाठी समर्पित आहे. 

आपल्या इथे म्हण आहे, ” स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी”, याचाच अर्थ तो सर्वांतर्यामीं परमात्मा ज्याच्यापासून हि सर्व सृष्टी निर्माण झाली, जो या सृष्टीचा पालनकर्ता आणि संहारक आहे, जो आदी आहे आणि अंत देखील, जे  स्वतः अनंत आहेत असे परमेश्वर देखील, या आईच्या मातृत्वाचा अनुभव घ्यायला ललाईत असतात. त्यासाठीच निरनिराळ्या युगात पृथ्वीवर अवतरित होऊन या वात्सल्याचा अनुभव घेतात. या सृष्टीत अशी एकही जागा नाही अथवा वस्तू नाही जेथे त्या सर्वांतर्यामीं भगवंताचा वास नाही, तरी प्रेमाने आपण असे म्हणतो, ” देवाला सगळीकडे उपस्थित राहणं शक्य नसल्यामुळे त्याने पृथ्वीवर आईला सगळ्यांवर वात्सल्यपुर्ण प्रेमाची जबाबदारी दिली”. 

आपल्या भारतात आपल्याला नरदेह प्राप्त झाला, हे आपले सगळ्यात मोठं भाग्य आहे. त्यातही मोजक्या  पुण्यात्म्यांना सद्गुरुप्राप्ती चे अमृतानुभव झालेले आहे. मानवजन्माचे परम उद्दिष्ट म्हणजे भगवद्प्राप्ती हेच होय. भगवंतांच्या चरणी लिन राहून, शेवटी भगवंतांची प्राप्ती आपल्या सगळ्यांना  व्हावी म्हणून आपल्यावर कृपेचा अविरत वर्षाव करणाऱ्या श्री.सद्गुरुंना देखील आपण ‘माउली’ म्हणून संबोधतो.  

आईचा महिमा इतका, कि आपण मोठ्या लोकांच्या प्रेमा बद्दल जरी  ते पुरुष असले तरी आदर व्यक्त करताना म्हणतो, “त्यांनी माझ्यावर मातृवत प्रेम केले.” प्रेमाची परकाष्ठा म्हणजे मातृप्रेम असं आपण मानतो. 

आईसोबत प्रेम,जिव्हाळा, वात्सल्य हि शक्ती असली तरी आपण एक विसरून चालणार नाही. या जगात सगळ्यात मोठी योद्धा देखील आईच आहे. ९ महिने आपल्या गर्भात स्वतःच्या देहाचा भाग बनवून बाळाचा सांभाळ आई करते, इतके कष्ट सहन केल्यावर प्रचंड प्रसव वेदना सहन करून बाळाला जन्म देते आई. इतकी अमर्याद सहनशक्ती भगवंतांनी फक्त स्त्रीलाच प्रदान केली आहे. असंख्य कष्ट सहन करत नवं सृजनशक्ती जोपासणारी हि आईच असते. 

बाळाच्या जन्मापासून, त्याच संगोपन, संस्कार, शिक्षण, आहार या सगळ्या जबाबदाऱ्या आई  समर्थपणे पार पाडते. बिकट परिस्थितीतही, आई आपल्या वाटणीचे घास मुलांसाठी ठेऊन त्यांचं पोट भरते आणि ते सुद्धा कुणाला न कळू देता. मुलांचे अनेक दोष पोटात घेऊन त्यांना सन्मार्गाला लावण्यासाठी अविरत कष्ट आपली आईच करत असते. विचार करा, आपले अनेक दोष आईने पोटात घेतले नसते, तर आपल्या वडिलांकडून आपल्याला कितीसा प्रसाद मिळाला असता. 

आजच्या काळात, आई आणि वडील दोघेही बहुतेक हे नोकरी व्यवसायात आहेत. मागील काही वर्षात स्त्रियांनी शिक्षणाचा भरपूर उपयोग करून नोकरी आणि व्यवसायातही आपले स्थान सिद्ध केले आहे. असं असताना देखील ज्या स्त्रियांनी मातृत्व स्वीकारलं, त्या नक्कीच आपल्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत आहेत.

कॉर्पोरेट लिडरशिप या विषयावर लेखन करणाऱ्या माझ्या आवडत्या लेखकाचं खालील वाक्य मला फार आवडतं –

” Leadership is not about being in charge. It’s about taking care of those who are in your charge”  

या वाक्यानुसार विचार केला तर जगातील सर्वश्रेष्ठ लीडर हि आपली आईच आहे, असं मला वाटतं. कारण, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपत पर्यंत एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या पार पाडताना, अगदी भाजीत घालायच्या मिठाच्या प्रमाणापासून ते मुलांच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा विचार ती करत असते. मुलांच्या उज्ज्वल आयुष्यासाठीचे निर्णय प्रासंगि कठोर का असेना ती सहज घेते आणि घेतलेले निर्णय तडीस न्यायला परिश्रम पण करते. इतकं असूनही मुलांच्या यशाचं श्रेय कधीच आपल्याकडे ठेवत नाही आणि जर का कधी अपयश आलं तर अधिक कठोर परिश्रमाची तयारी देखील आईच ठेवते. यालाच तर लिडरशिप म्हणतात. 

मिळालेल्या यशाचं किंचितही श्रेय आपल्याकडे न ठेवणं पण आलेल्या अपयशासाठी जबादारी स्वीकारून मुलांना परत उभं करणं हे आई निरंतर करत असते. म्हणूनच तर आम्हा मुलांना आईचा इतका लळा असतो. तो इतका अतिरेकी असतो कि आनंदातही आई आणि काही दुःख झालं तरी सर्वप्रथम आईचंच नाव जिभेवर येतं. 

मला इथे एक नक्कीच बोलावसं वाटतं कि, ज्या स्त्रियांनी लौकिकार्थाने मातृत्व न स्वीकारण्याचा निर्णय घेतलेला आहे किंवा काही कारणांनी ज्यांना मातृत्व करता आलं नाही त्यांच्या ठायीसुद्धा भगवंतांनी असीम मातृत्व प्रदान केलेलं आहे. प्रेम, जिव्हाळा, वात्सल्य, मातृत्व ह्या सर्व शक्ती भगवंतांनी स्त्रियांच्या ठायी प्रदान केलेल्या आहेत. आपल्या परिवारातील सर्व मातृशक्ती हि आईच्या, बहिणीच्या, मुलीच्या आणि इतर अनेक संबंधांच्या रूपात आपल्यावर वात्सल्याचा जो वर्षाव करत असतात त्यालाच मातृत्व आपण म्हणू शकतो. 

इतकंच काय, जर आपण इतर प्राण्यांचा विचार केला तरी आपल्याला हे मातृत्व बघता येईल. आपण कधी गायींचा गोठा बघितला असेल, ज्या ठिकाणी अनेक गायी आणि त्यांची वासरं असतात. गाय वासराला जन्म दिल्यावर इतक्या सगळ्या वासरांमध्ये आपलं वासरू नेमकं कसं ओळखते? तर ती आपल्या वासराच्या टाळूचा वास घेऊन ओळखते. आपल्याकडे सुद्धा, बाळाच्या बारशाच्या दिवशी बाळाच्या टाळूचा वास घेण्याची पद्धत आहे, ह्यालाच म्हणतात मातृत्व. 

आपल्या  शास्त्रात ऋणसिद्धान्तानुसार देवऋण, ऋषिऋण, ब्रह्मऋण आणि पितृऋण फेडण्यासाठी साधना सांगितली आहे. परंतु मनुष्य आपल्या जन्मात आणि त्या नंतरही मातृऋणातून कधीच मुक्त होऊ शकत नाही. अगदी आपल्या कातडीचे जोडे करून आईला घातले तरीसुद्धा नाही. एखाद्या मनुष्याने जर संन्यास आश्रमाचा स्वीकार केला तरी ती व्यक्ती मातृऋणातून मुक्त होत नाही. म्हणूनच या मातृशक्तीला वंदन करण्याचा विचार करून केलेला हा आजचा लेखन प्रपंच. 

शेवटी इतकंच म्हणेन, मी आज जे काही यश आयुष्यात मिळवू शकलो ते फक्त माझ्या दोन मातृशक्तींमुळे. सर्वप्रथम म्हणजे माझे समर्थ सद्गुरुमाऊली आणि त्यांच्यापर्यंत नेणारी माझी जन्मदाती आई. 

आजचा लेखन प्रपंच माझी सद्गुरुमाऊली आणि आईच्या चरणांवर समर्पित. 

 II अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त II

14 thoughts on “आई..भगवंतांची वात्सल्यमूर्ती!

 1. पुष्कर,

  खूप छान लिहिले आहे. अगदी खरं आहे आपण मातृऋणातून कधीच मुक्त होऊ शकत नाही.
  असंच लिहत राहा,👍👍👏👏

  Liked by 1 person

 2. आई सारखा या जगात कोणीच नाही, आणि तिची जागापण कोणी घेऊ शकत नाही, एकदम सार्थक लेख आहे आईवर.🙏🙏🙏 सर्व सुनांना हे लेख वाचायला दिल पाहिजे. आणि त्यांना सांगायला पाहिजे की नवऱ्याला खुश ठेवायचे असेल तर आईची सेवा करा. मग नवऱ्याला शिव्या घातल्या तरी चालेल🙏😀

  Liked by 1 person

 3. छानचं लिहिलंय, आई नेहमीच वंदनीय असते. पण एक आई म्हणून म्हणेन की इतके सुंदर विचार असणारे मुलं आईला धन्य करतात

  Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s