आपण सगळे व्यसनाधीन झालोय का?

addiction-hindi-1-1024x569

आपण सगळे मागील ३ दिवसांपासून बघतोय देशात दारूची दुकाने सुरु केल्यानंतर साधारण एक प्रकारचा उत्साह काही लोकांत संचारला आहे. एक म्हणजे ज्यांना दारू विकत घ्यायची आहे ते लोक आणि दुसरे ज्यांना अश्या परिस्थितीवर खूप सारे मेसेजेस करायचे आहेत अशी मंडळी. सारं कसं एकदम व्यवस्थित झाल्यासारखं वाटतंय जणू. 

बरं  एकदा मेसेज करून आपण दमलो तर भारतीय कसले? खूप सारे दारू वरचे आणि झालेल्या गर्दीवरचे खमंग मेसेजेस अधिकाधिक करावे आणि सगळं कसं आनंदात आहे याचा भास करून घ्यावा. मग परिस्थितीवर मात करायला झटणारे डॉक्टर्स, पोलीस यंत्रणेतील आणि सर्व स्तरातील कार्यकर्ते मंडळी आणि त्यांचे प्रयत्न चुलीत गेले तरी चालतील.  

काही मेसेजेस मध्ये तर पोलिसांची कशी तारांबळ उडते दारूबाज लोकांमुळे यावर जोक्स फिरत आहेत. पोलीस दलातील अनेक बंधू -भगिनी गेली कित्येक दिवस आपल्या घरच्यांना भेटली देखील नसतील. एप्रिल आणि मे महिन्याच्या उन्हात दिवसभर आपल्यासाठीं ते लोक राबत आहेत. पोलीस दलातील अनेक भगिनी आपल्या लहान मुलांना जवळ देखील घेऊ शकल्या नसतील सध्याच्या परिस्थितीमुळे.  अश्या परिस्थितीत पोलिसांना आणि आपल्या जीवावर उदार होऊन राबणाऱ्या कार्यकर्त्यांना मदत करणे हे आपलं प्रथम राष्ट्रीय कर्तव्य आहे,अशी अपेक्षा दारूबाज लोकांकडून ठेवणं हे मूर्खपणाचंच आहे, परंतु इतर सुज्ञ मंडळी इतकी बेजबाबदार कसे वागू  शकतात?

आजच्या युगात एखादी बातमी जंगलातील आगीसमान पसरते, असं असताना सुद्धा दारू घेणाऱ्या मंडळींचे फोटो, त्यांनी घेतलेल्या दारूच्या बिलाचे फोटो, लागलेल्या रांगांचे  फोटो फेसबुक आणि वॉट्सअँप वर पसरवणे  आमच्यातील काही सुज्ञ मंडळी सातत्याने करीत आहेत. त्यावर दारूबाज मंडळी कश्याप्रकारे अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मदत करत आहेत हे सांगणारे मेसेजेस सुद्धा चिकार आहेत.  असे सुज्ञ लोकं स्वतः प्रत्यक्ष दारूसाठी रांगेत लागून देशाचे नुकसान करीत नसले तरीदेखील, दारूबाज लोकांइतकेच ते देखील दोषी आहेत. फरक इतकाच कि, दारू पिणारी व्यक्ती हि शरीराने व्यसनाधीन असते म्हणून  जीवावर उदार होऊन दारू विकत घेते आणि इतर बुद्धिजीवी लोकं बौद्धिक आणि मानसिक व्यसनाधीन झालेले आहेत म्हणून व्यसनाधीनतेला प्रतिष्ठा देण्याचे कार्य करत असतात. 

मला आठवतं, फक्त १५-२० वर्षांपूर्वीपर्यंत दारू पिणाऱ्या व्यक्तीला समाजाचा थोडा का होईना, पण धाक वाटायचा. आपल्याला कुणी दारू विकत घेताना बघू नये , घरात थोरा  मोठयांनां समजू नये  याची काळजी असे लोक घ्यायचे आणि समाज देखील व्यसनं करणाऱ्या व्यक्तीकडे टाकाऊ नजरेनेच बघायचा.  एखाद्या घरात दारू पिऊन नवरा बायकोला,मुलांना  मारत असल्याचे समजताच  समाजातीळ मंडळींनीं धाक निर्माण केल्यावर अशी प्रकरणं काही अंशी थांबायची. पण  दुर्दैवाने आज अशी परिस्थिती नाही. 

आज दारू, तत्सम इतर व्यसनं आणि अश्या व्यसनांना अधीन लोकांना  समाजात प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. आजकाल सिनेमांमध्ये, टीव्हीवर, लग्नसमारंभात, छोटेखानी कार्यक्रमात, ऑफिसच्या कार्यक्रमात  दारूचा सर्रास वापर आपण बघत आहोत.  पार्टी म्हंटली कि दारूशिवाय होऊच शकत नाही असं झालंय अलीकडे. दारू पिणारा मुलगा हा ऑल राऊंडर आणि दारू नं  पिणारा भेकाड असे काहीसे चित्रं समाजात  काही लोक पसरवत असतात. त्यामुळे अनेक  तरुण मंडळी स्वतःचे अस्तित्व सिद्ध करायला सुद्धा अनेकदा दारूच्या आहारी जाण्याचे पाऊल उचलत आहेत. 

मागील ३ दिवसात व्यसनाधीनतेचा जो विद्रुप चेहरा आपण बघितला तो फक्त सिनेमाचा एक ट्रेलर आहे. खरा चेहरा म्हणजे आपल्या भारतीय समाजाचे होणारे नैतिक खच्चीकरण.  अश्याच व्यसनी लोकांनी आधी दिल्लीत आणि नंतर हैद्राबादेत केलेले बलात्कार समाज सोईस्कर पणे विसरला.  व्यसनाधीन लोकांनी केले अनेक अपराध देखील आजकाल समाज अश्याच पद्धतीने दुर्लक्षित करताना आपल्याला दिसेल. कारण अश्या परिस्थितीला सामोरे जायला आपल्यात नैतिकतेचे बळ असावे लागते आणि समाज तेच हरवायला निघाला आहे. 

मराठी कुटुंब तसं साधं मध्यमवर्गीय आयुष्य जगणारं असायचं, त्यात चंगळ  म्हंटली कि दोन चार मित्र आणि नातेवाईक जमून जेवणाचे बेत आणि नंतर काही गोडधोड असायचे. पण आता मात्र परिस्थिती वेगळी आहे, बाबा घरातील सगळ्यांना सोबत बसवून आनंदाने दारू घेतात असं मुलं गर्वाने सांगू लागलीत. घरातील स्त्रियांना देखील दारू असल्याशिवाय पार्टी होतंच नाही असे वाटायला लागले आहे. म्हणूनच तर श्रीमंत बाजीराव पेशव्यांना एखाद्या व्यसनाधीन देवदासाप्रमाणे आपले मराठी लोकं हिंदी सिनेमात आवडीने बघतात.  श्रीमंत बाजीरावांचे चरित्र मुलांना सांगायला आई वडील तरी आधी शुद्धीत असायला हवे ना. म्हणूनच छत्रपती शिवाजी, श्रीमंत बाजीराव, अब्दुल कलाम हि मंडळी या मातीला अपवाद आहेत आणि दारू पिणारे देवदास इथला नैसर्गिक पायंडा होत चालला आहे. 

आपल्या पैश्याने कोणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, दारू पिऊ नये हे सांगणारा मी कोणी नाही. परंतु देशावर इतकं  मोठं संकट असताना आपण देशाचे देणं लागतो आणि त्याचा कर्तव्याबोध ठेऊन आपण आचरण केलं तर आपल्या परिवाराचं आणि समाजाचं भलंच होईल.  घरातील लहान मंडळी आपले आई वडील, मोठी मंडळी कसे वागतात त्याचे अवलोकन बारकाईने करत असतात. या संकटकाळी आपण योग्य ते वागून लहान मंडळींसमोर सुद्धा एक आदर्श मांडू शकतो. 

जो पर्यंत हे संकट आपल्या देशावरून जात नाही तो पर्यंत तरी किमान आपण अश्या बेजबाबदार दारूबाज लोकांप्रमाणे वागणार नाही आणि त्यांच्या कृतीला समर्थन देणारे आणि सर्व डॉक्टर्स, पोलीस दलातील कर्मचारी, इतर सर्व कार्यकर्ता मंडळींचे मनोधैर्य कमी करणारे मेसेजेस पसरवणार नाही याची काळजी घेऊया.

आपण जरी कुठल्याही व्यसनाला शरीराने बळी पडलो  नसलो तरी बौद्धिक आणि मानसिक व्यसनाधीन  होणार नाही याची काळजी घेणे सुद्धा आपलेच कर्तव्य आहे. 

II अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त II 

9 thoughts on “आपण सगळे व्यसनाधीन झालोय का?

  1. बेजबाबदार पणा हे आता लोकांचे भुषण झाले आहे. काही अती शहाणी मंडळी जेंव्हा या वागण्याचे समर्थन करतांना जी शब्द सुमने उधळतात तेव्हा तर कळसच होतो. सद्सद् विवेक संपत चालला आहे. शहरातील सुसंकृत समाजात हे स्तोम अती होत आहे.

    Liked by 1 person

  2. खरं आहे. अघोषित पाठिंबा हाही थांबणं आवश्यक आहे., ‘मद्यम कुल विनाशकं’ एक संकृत सुभाषित आहे….

    Liked by 1 person

  3. देशापुढील कोरोना रुपी संकटामुळे प्रत्येकच क्षेत्राची हानी होत आहे. फक्त आर्थिक परिस्थिती सुव्यवस्थित राहावी, या करिता गेल्या काही दिवसात मद्य विक्री परत सुरू करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला. शासनाने मद्य विक्री मार्फत मिळणाऱ्या आर्थिक स्रोतांचा विचार करून कदाचित हा निर्णय घेतला असावा. परंतु ज्या प्रकारे आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी असा निर्णय घेतला,त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रातील तोटा भरून काढण्यासाठी काही उपाय योजना करण्यात आलेल्या दिसून आलेल्या नाहीत. मद्य विक्री मुळे आर्थिक स्थिरता काही अंशी लाभेल देखील परंतु त्यामुळे सामाजिक स्वास्थ अस्थिर नक्कीच होणार आहे. याबाबत समाजाने आपल्या व्यसनाची अधिनता समाज माध्यमाद्वारे दाखवून दिलीच आहे. मंथन करणे खरच गरजेचे आहे.
    माझे मित्र पुष्कर सगदेव यांनी आपल्या परखड शब्दातून समाजाला सामाजिक मर्यादेची जाण करून देण्याचा जो प्रयत्न प्रस्तुत लेखाद्वारे केला आहे तो अत्यंत हृदयस्पर्शी व मार्मिक असून स्वागतहार्य आहे. परमेश्वर आपणास आपल्या उद्दिष्ट पूर्तीस साह्य करो, मनापासून प्रार्थना.

    Like

Leave a reply to Rohit Palaskar Cancel reply