ध्येयप्राप्तीसाठी नियोजनाचे महत्व

कॉर्पोरेट सेक्टर च्या प्रोजेक्ट मिटींग चा ज्यांना अनुभव आहे त्यांना एक वाक्य कदाचित ओळखीचं असेल “What’s your Action Plan?” 
कुठल्याही निश्चित उद्दिष्टप्राप्तीसाठी एक कृतिशील नियोजन गरजेचं असतं म्हणूनच हा प्रश्न महत्वाचा असतो. 

काही लोकं या प्रश्नावर त्यांची सखोल मतं मांडतात, काही लोकं शांत बसतात, तर काही म्हणतात या उगीचच्या कागदी प्लॅन्सची आम्हाला काहीच गरज नाही.

परिणाम काय तर जी मंडळी “What’s your Action Plan?” या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात ते इतर मंडळींचं नेतृत्व करतात आणि इतर मंडळींच्या कामाचा उपयोग स्वतःच्या प्रगतीसाठी करून स्वतःच एक वेगळं स्थान निर्माण करतात.

नियोजनशून्यतेचे वर्तमान आणि इतिहासातील काही उदाहरणं …

आपल्याला अनेक लोक भेटतात कि जे सांगतात या वर्षी मी १० किलो वजन कमी करणार आहे, खूप आर्थिक गुंतवणूक करणार आहे, अमुक अमुक सामाजिक कार्य करणार आहे आणि सगळ्यात सोपं मी या वर्षी माझं व्यसन सोडणार आहे. बहुतांश मंडळी दुसऱ्या वर्षी परत हेच निश्चय करतात आणि नियोजनाअभावी अयशस्वी होतात.

जगात असे अनेक लोक सापडतील जे कुणाच्यातरी सांगण्यावरून शेअर मार्केट मध्ये वर्षानुवर्षे निवेश करतात तेही कुठलाही अभ्यास न करता. अनेकांना जिथे रक्कम गुंतवली त्या म्युच्युअल फंडांची नावं देखील माहिती नसतात. हि रक्कम घर खरेदी, मुलांचे शिक्षण, मुलांची लग्न इतक्या महत्वाच्या उद्दिष्टांसाठी असते आणि गुंतवणुकीचा परतावा मनासारखा न आल्यामुळे हि सगळी उद्दिष्ट अपूर्णच राहून जातात.

आपण एखादी सहल प्लॅन करतो तेव्हा किती विचार करतो, कुठे जायचं, कुठल्या मार्गानी जायचं, हॉटेल कुठलं, विमान,रेल्वे,बस या सगळ्या मार्गांचा विचार करतो मग परिवारासोबत घरून निघतो. मग घरच्यांच्या आयुष्याच्या प्रवासाविषयी इतकी निष्काळजी कशी?

घर खरेदी, मुलांचे शिक्षण, मुलांची लग्न यासाठी रक्कम जमवताना आपण किमान किती रक्कम जमवायची आहे, किती वर्षात जमवायची, कुठे गुंतवणूक करावी याचं नेमकं नियोजन ,काही अवधीत केलेल्या गुंतवणुकीचे पुनरावलोकन जर आपण केल नाही तर याला अक्षम्य निष्काळजीपणाच म्हणावं लागेल.

अश्या फाजील आत्मविश्वासाची अनेक उदाहरणं आपल्याला इतिहासात देखील सापडतील. आपल्या सगळ्यांच्या माहितीतील उदाहरण म्हणजे शिवचरित्रातील अफजल खान वध.

नियोजनशून्यता, फाजील आत्मविश्वास, ध्येय गाठताना परिस्थिती विषयी बेसावधपणा ह्या शत्रूच्या अवगुणांचा शिवाजी राजांनी पुरेपूर उपयोग करून घेतला. आपल्या ध्येयाविषयी सर्व माहिती जमवली,उत्तम नियोजन केले, बॅक अप प्लॅन देखील ठेवला, अखंड सावधपण ठेऊन वेळोवेळी केलेल्या योजनेचं पुनरावलोकन सुद्धा केलं. परिणाम आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे.

आता आपल्याला ठरवायचे आहे, ध्येयाचा विचार करताना या दोन व्यक्तींपैकी कुणाचे नियोजन कौशल्य आपण स्वतः मध्ये आणायचे आणि परिणाम बघायचे.

नकारात्मकता आणि उपाय…

अजूनही ज्या लोकांना Action Plan म्हणजेच कामाचं नियोजन करणे निरुपयोगी वाटतं त्यांना ठरवायचे आहे कि आयुष्यभर लोकांनी सांगितलेली कामच करायची कि स्वतःची ध्येय गाठायला काही उद्द्योग करायचे?
काही वेगळं करून शेवटी परिणाम तर नेहमीचाच नकारात्मक येणार असं या लोकांना सारखं वाटत असतं.अशी मंडळी नकारत्मक विचारांमुळे कधी काही प्रयत्नच करत नाहीत.
हि नकारात्मकता कधी ते स्वतः आपल्या डोक्यात निर्माण करतात तर कधी इतर लोकं त्यांच्या विचारांची टिंगल उडवून निर्माण करतात.
आपण रोज सकाळी नेहमीच्याच वेळेला उठतो,पलंगाच्या नेहमीच्याच बाजूनी उतरतो, रोजच्यासारखीच स्नानादी कर्मे उरकतो, रोजच्याच वेळेला न्याहारी करून  रोजच्याच  ठरलेल्या मार्गाने ऑफिसला जातो, त्याच टेबलवर तेच काम दिवसभर करतो, सहकाऱ्यांसोबत त्याच गप्पा रोज करतो, ठरल्यावेळी काम बंद करून त्याच मार्गानी परत घरी येतो, घरी येऊनही तेच टीव्ही सिरीयल आणि तोच नेहमीचा टाईमपास करतो, रात्री त्याच नेहमीच्या वेळी झोपायला जातो.
आता सांगा आपण आपल्या प्रयत्नात आणि दिनचर्येत काहीच बदल न करता वेगळ्या परिणामांची अपेक्षा कशी करू शकतो?
आपण जर काही ध्येय ठेवलं असेल तर स्वतःला प्रामाणिकपणे विचारा कि, ध्येयप्राप्तीच्या दृष्टींनी आपण आज काय काम केलं, मागल्या सात दिवसात काय काम केलं, मागच्या ९० दिवसात कुठलं पुस्तक वाचलं, मागच्या वर्षभरात कुठलं नवीन ज्ञान किंवा कौशल्य आत्मसात केलं, वर्षभरात किती लोकांना ध्येयप्राप्तीसाठी भेटून काही प्रयत्न केले, किती वेळा ध्येयाच्या पूर्तीसाठी काही नियोजन केलं.
यशाचा मार्ग कधीच सोपा नसतो, मग क्षेत्र कुठलही असो. काही लोकांना वाटतं यशस्वी लोक नशिबानेच यशस्वी होतात, त्या यशामागची कठोर मेहनत आणि अनन्वित कष्ट त्यांना कधीच दिसत नाहीत.  नेहमी लक्षात ठेवा  “Success has no Hard and Fast rules. It has only Hard and Hard ones.”

यशप्राप्तीचं रहस्य कायं…
ग्रीक तत्वज्ञ सॉक्रेटिसला एकदा एका तरुणाने यशप्राप्तीचं रहस्य विचारलं, त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी सॉक्रेटिसने त्याला एका नदीकाठी बोलावलं.
सॉक्रेटिस त्या तरुणाला म्हणाला यशप्राप्तीचं रहस्य मी तुला नदीपात्राच्या मधोमध सांगतो आणि त्या तरुणाला नदीपात्रात घेऊन आला. नदीपात्रात आल्याबरोबर सॉक्रेटिसने त्या तरुणाचं मुंडक धरून पाण्यात दाबलं जेणेकरून त्याला श्वासदेखील घेता येऊ नये.
काही क्षणातच तो तरुण हात पाय मारून थकला तेव्हा सॉक्रेटिसने त्याला बाहेर काढून विचारलं जेव्हा तू पाण्याखाली होतास तेव्हा तुला जगातील सगळ्यात हवीशी गोष्ट कोणती वाटली.
तो तरुण क्षणाचाही विलंब न करता उत्तरला, श्वास घेण्यासाठी हवा मला सगळ्यात हवीहवीशी वाटली.
सॉक्रेटिस  त्या तरुणाला म्हणाला एक श्वास घ्यायला जसे कमालीचे प्रयत्न तू केलेस तसेच प्रयत्न ध्येयप्राप्तीसाठी केले तर आणि तरच तुला यशप्राप्ती होईल.
हेच यशप्राप्तीच रहस्य आहे. ह्यालाच म्हणतात यशप्राप्तीसाठी लागणारी दुर्दम्य इच्छाशक्ती.
जेव्हा ध्येयप्राप्ती हा विकल्प नसून जीवन मरणाचा प्रश्न असतो तेव्हाच केलेल्या प्रयत्नांत विश्वास वाढतो आणि माणूस  कठोर परिश्रम करून यश प्राप्त करत असतो.
ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्नांची सगळ्यात पहिली पायरी म्हणजे कृतिशील नियोजन.
कृतिशील नियोजन कसे करावे …
एका अभ्यासात असा निष्कर्ष समोर आलाय कि जगात फक्त ३% लोकच आपले ध्येय कागदावर लिहून घेतात आणि त्यासाठी नियोजनबद्ध कृती करतात, तर ९७% लोक आपल्या स्वप्नांना ध्येय समजून गोंधळलेली असतात आणि अपयशी होतात.
ध्येयप्राप्तीसाठी केलेले  विचार लिहून घेतल्याने ते विचार आपल्याला निश्चित प्रयत्नांची एक पक्की दिशा दाखवतात आणि योग्य दिशेने केलेलं  नियोजन आपल्या अवचेतन मनात कोरल्या जातं आणि परिणामतः ते ध्येय गाठायला आपण प्रतिबद्ध होत असतो.
ज्यांना आपल्या आयुष्यात आपले ध्येय गाठायचे आहे आणि त्यासाठी काही निश्चित नियोजन करायचे आहे त्यांनी खालील काही गोष्टींचा विचार केल्यास फायद्याचं होईल असं मला वाटतं –
 • आपल्या मनातील निश्चित ध्येय आणि त्याविषयीचा विचार सर्वप्रथम कागदावर लिहून घ्या. ह्यामुळे आपल्याला विचारांची स्पष्टता आणि ध्येयाची निश्चितता समजेल.
 • एका वेळेला केवळ तीन ध्येयांविषयीचं नियोजन करा म्हणजे लक्ष केंद्रित करायला सोपं होईल.
 • निश्चित ध्येय लिहा म्हणजे उदा. खूप पैसे जमवायचे यापेक्षा नक्की किती जमवायचे तो आकडा लिहा.
 • ध्येय गाठायची निश्चित कालमर्यादा ठरवा मग ते कुठलंही ध्येय असो ( उदा. आर्थिक, सामाजिक कार्याबद्दल, पारिवारिक, स्वतःच्या तब्येतीसाठी, शिक्षाणाविषयी )
 • ठरवलेल्या उद्दिष्टाविषयीची आणि उपयुक्त साधनांची जास्तीत जास्त माहिती गोळा करून लिहिलेली चांगली.
 • जर ठेवलेलं ध्येय दीर्घकालीन असेल तर त्यासाठी लहान लहान अल्पकालीन उद्दिष्ट आपण ठेऊ शकतो ज्यामुळे मोठं ध्येय गाठायला मदत होईल.
 • ध्येयाची आपण १ वर्ष,३-५वर्ष, १० वर्ष आणि अधिक अशी विभागणी करून घेऊ शकतो आणि त्याप्रमाणे नियोजन करू शकतो.
 • अनेक जवळची मंडळी आपल्याला मदत करू शकतात अश्या सगळ्यांची नावे देखील यादीत लिहू शकतो आणि नियोजनात त्यांची मदत घेऊ शकतो.
 • संपूर्ण यादी झाल्यावर सगळी माहिती संकलित करून प्राथमिकतेनुसार आपण प्रयत्न सुरु करू शकतो.
 • कामाचं नियोजन करताना महिन्याचं नियोजन १ तारखेला, आठवड्याचं नियोजन आदल्या वीकेंडला आणि दिवसाचं नियोजन आदल्या संध्याकाळी करा.
 • वेळोवेळी केलेल्या नियोजनाचं आणि प्रयत्नांचं पुनरावलोकन सुद्धा महत्वाचं आहे.
थोडक्यात काय आपण आज आयुष्यात ज्या ठिकाणी आहोत आणि आपल्याला आयुष्यात जे ध्येय गाठायचे आहे तिथपर्यंतच्या प्रवासाची आखणी म्हणजे  कृतिशील नियोजन.
II अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त II

15 thoughts on “ध्येयप्राप्तीसाठी नियोजनाचे महत्व

 1. ध्येय पुर्ती कडे योग्य वाटचाल करताना बरेच जण नियोजनाच्या अभावी दिशाहीन होतात. अशांसाठी हे योग्य मार्गदर्शन ठरू शकते.
  खुप छान पुष्कर.

  Liked by 1 person

 2. अशा प्रकारे नक्कीच ध्येयपुर्तता होते. फारच छान

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s